सामाजिक चळवळीच्या अभ्यासावरुन, व्याख्येवरून आपल्याला सामाजिक चळवळीची काही प्रमुख वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे सांगता येतील
1)परिवर्तनाची आकांक्षा:-
कोणतीही चळवळ निर्माण होण्यासाठी प्रचलित व्यवस्थेबद्दल असलेली असमाधानाची परिस्थिती आवश्यक असते. या असमाधाना मधूनच प्रचलित व्यवस्था व तिची मुल्ये बदलून नवी व्यवस्था व नवी मूल्ये करण्याची आकांक्षा लोकांच्या मनामध्ये तीव्रपणे निर्माण होणे गरजेचे असते.
2)विचारप्रणाली:-
सामाजिक चळवळीला अभिप्रेत असलेले परिवर्तन अर्थातच एका नव्या व्यवस्थेच्या कल्पनेवर आधारलेली असते. शी नवी व्यवस्था कशी असेल कोणत्या आदर्शावर व मूल्यांवर आधारलेली असेल याबाबतची स्पष्ट मांडणी करणारी विचारप्रणाली चळवळीसाठी आवश्यक असते. काहीजण याला पर्यायी विचारप्रणाली (Counter Ideology) असेही म्हणतात.
3)नेतृत्व:-
व्यवस्थेबद्दल असमाधानी असणाऱ्या लोकसमूहाला विशिष्ट विचारधारेच्या आधारावर संघटित करणे, कृतिप्रवण करणे आवश्यक असते. हे कार्य नेतृत्वाच्या व संघटनेच्या माध्यमातूनच शक्य असते, म्हणून नेतृत्व व संघटना ही सामाजिक चळवळीची एक महत्त्वपूर्ण गरज असते.
4)सामूहिक कृती:-
प्रस्थापित व्यवस्था बदलून त्याऐवजी नवी व्यवस्था आणणे, यासाठी व्यापक स्वरूपाची संघटित अशी लोककृती (Mass Action) आवश्यक असते. व्यापक लोकसहभागाशिवाय परिवर्तन शक्य नसते, सामूहिक कृती ही बाब चळवळीसाठी महत्त्वपूर्ण असते.
4) समाजजीवनाला प्रवाहित ठेवणारी प्रक्रिया:-
सामाजिक चळवळ एक समाज जीवनाला प्रवाहित ठेवणारी प्रक्रिया आहे. स्थिर, रूढीबद्ध अशा समाजात आलेले साचलेपण आणि जडत्व यातून अनेक समाज घटकांची विकास प्रक्रिया थांबलेली असते. अशा समाज घटकांच्या इच्छा आशा आकांक्षा व स्पंदने प्रकट करणाऱ्या घडामोडी म्हणजे सामाजिक चळवळी होत. अशा स्पंदनांच्या प्रकटीकरणातून ती व्यवस्था जिवंत व प्रवाहित होत असते. समाजजीवनाच्या प्रवाहात आलेले अडथळे दूर करण्याची प्रक्रिया सामाजिक चळवळी करत असतात.
6) दीर्घकालीन प्रक्रिया:-
सामाजिक चळवळ ही एक दीर्घकालीन प्रक्रिया आहे. सामाजिक चळवळ ही व्यवस्थेतील मूल्य,रचना यांच्या परिवर्तनाशी संबंधित प्रक्रिया आहे. मुळातच व्यवस्थेतील असे परिवर्तन ही एक अत्यंत बहुआयामी, किचकट व गुंतागुंतीची प्रक्रिया असल्या कारणामुळे ती सहज साध्य नसते व त्यामुळेच ती अल्पकालीन नसते. चळवळीच्या समोर असलेल्या उद्दिष्टापैकी काही उद्दिष्टे साध्य होतात तर कालौघामध्ये समाज व्यवस्थेपुढे नवी आव्हाने नवे प्रश्न निर्माण होतात त्यांची सोडवणूक करण्याची जबाबदारी सामाजिक चळवळीवर येऊन पडते त्यामुळेच सामाजिक चळवळ ही दीर्घकालीन प्रक्रिया आहे किंबहुना असेही म्हणता येईल की सामाजिक चळवळ ही एक अव्याहत प्रक्रिया आहे.
7) शांततामय, सनदशीर मार्गासोबतच असंस्थीकृत मार्गांचाही अवलंब:-
सामाजिक चळवळी आपल्या ध्येयसिद्धीसाठी शांततामय सनदशीर मार्गांचा अवलंब करण्यासोबतच हिंसात्मक स्वरूपाच्या असंवैधानिक कृती आणि असंस्थीकृत मार्गाचा अवलंबही करतात. सर्वसाधारण परिस्थितीत लोकजागृती, लोक चेतना निर्माण करून आपल्या चळवळीला, विचारधारेला अधिक अधिक जनसमर्थन मिळवणे, या जनसमर्थनाच्या रेट्यातून व्यवस्थेवर दबाव आणत आपल्या मागण्या मान्य करून घेणे अशा कार्यपद्धतीचा अवलंब सामाजिक चळवळी करत असतात. परंतु काही विशिष्ट परिस्थितीत आपल्या ध्येयसिद्धी साठी सामाजिक चळवळी हिंसात्मक आंदोलनांचा, असंवैधानिक व असंस्थीकृत मार्गांचाही अवलंब करण्यास मागे पुढे पहात नाही. तर काही सामाजिक चळवळी या मुळातच हिंसात्मक तत्वज्ञानावर आधारित असतात उदा. नक्षलवादी चळवळ.
8) सामाजिक समस्या, तणाव व संघर्षातून उदय:-
कोणतीही सामाजिक चळवळ ही प्रचलित समाजव्यवस्थेतील दोष, उणिवा विसंगती यांचे अपत्य असते. समाजव्यवस्थेतील अशा दोषामुळे समाजामध्ये उत्पन्न होणाऱ्या समस्या, तणाव आणि संघर्षांचे निराकरण करण्याचा एक मार्ग म्हणून सामाजिक चळवळी काही पर्यायी आदर्श व मूल्यांची मांडणी करतात. प्रचलित व्यवस्थेप्रती असलेल्या असमाधानातून, सामाजिक असंतोषातून समाजाच्या एका मोठ्या घटकांमध्ये अन्यायाची, शोषणाची आणि ते संपवण्यासाठी सामाजिक परिवर्तन घडवून आणण्याची सामूहिक जाणीव एका सामाजिक घटकामध्ये जेव्हा निर्मान होते तेव्हा सामाजिक चळवळ आकाराला येते.
9) संघटित स्वरूप :-
संघटित स्वरूप हे सामाजिक चळवळीचे एक महत्वपूर्ण वैशिष्ट्य आहे. सामाजिक परिवर्तन ही एक बहुआयामी, गुंतागुंतीची मग तेवढीच आव्हानात्मक बाब असते. अशा परिवर्तनासाठी केला जाणारा प्रयत्न हा नियोजित व संघटित असल्याशिवाय यशस्वी होऊ शकत नाही.
10) मानवी मूल्यांची प्रस्थापना:-
सामाजिक चळवळीच्या माध्यमातून स्वातंत्र्य, समता, सामाजिक न्याय, मानवी हक्क यांची प्रस्थापना होत असते. सामाजिक व्यवस्थेतील दोष दूर करून आदर्श समाजव्यवस्था निर्माण करणे हे सामाजिक चळवळीचे एक मुख्य उद्दिष्ट असते. विविध सामाजिक चळवळीचे लक्ष्यबिंदू पाहता आदर्श मानवी मूल्यांची प्रस्थापना ही एक सामाजिक चळवळीचे वैशिष्ट्य आपल्याला दिसून येते.
11) विशिष्ट समूहाची अस्मिता, हितसंबंध यांची अभिव्यक्ती:-
सामाजिक चळवळी या विशिष्ट समाज घटकाची, विशिष्ट समूहाची अस्मिता, हितसंबंध यांची अभिव्यक्ती करत असतात. ‘स्व’ भान आलेल्या एखाद्या विशिष्ट लोक समूहाची सांस्कृतिक ओळख, त्याच्या हितसंबंधांचे जतन व संवर्धन, या समूहाच्या सामाजिक प्रश्नांची सोडवणूक करणे ही सामाजिक चळवळीची वैशिष्ट्ये ठरतात.
12) नागरी समाजाच्या पर्यावरणात सामाजिक चळवळीचीं वाढ:-
सामाजिक चळवळी या राज्यसंस्थेच्या परिघाबाहेर असलेल्या नागरी समाजाच्या (Civil Society) क्षेत्रामध्ये पर्यावरणामध्ये उदयास येतात व कार्यरत असतात. राज्यसंस्थेच्या क्रियाकलापावर लोकमताचा अंकुश नागरी समाजाच्या माध्यमातून लावला जात असतो. नागरी समाजाचे क्षेत्र जेवढे अधिकाधिक समृद्ध असेल तेवढ्या प्रमाणात सामाजिक चळवळी प्रभावीपणे कार्य करू शकतात. तसेच सामाजिक चळवळीच्या कार्यामधूनही राज्यसंस्थेच्या परिघाबाहेर नागरी समाजाचे कार्यविस्तारत असते. सामाजिक चळवळ व नागरी समाजाचा वैशिष्ट्यपूर्ण असा सहसंबंध आहे.