कार्ल मार्क्सचा द्वंद्वात्मक भौतिकवाद:

कार्ल मार्क्स हा वैज्ञानिक समाजवादाचा प्रवर्तक होय. विषमाधिष्ठीत समाजरचना का निर्माण झाली याची कारणमिमांसा व समताधिष्ठीत समाजरचना कोणत्या मार्गाने निर्माण करता येईल, याचे सुस्पष्ट विवेचन कार्ल मार्क्स ने केले आहे. हेच त्याच्या विचाराचे वैशिष्ट्य होय. मानवी समाजाचा विकास कोणत्या पद्धतीने होत आलेला आहे हे स्पष्ट करण्यासाठी मार्क्सने द्वंद्वात्मक भौतिकवाद या संकल्पनेचा आधार घेतला आहे. मार्क्सच्या एकूण तत्त्वज्ञानाचा मुलाधार असलेली एक महत्त्वपूर्ण संकल्पना म्हणून द्वंद्वात्मक मौतिकवादाकडे पाहिले जाते. द्वंद्वात्मक भौतिकवाद हे एक प्रकारे मार्क्सवाद समजून सांगणारे अथवा मार्क्सवादाकडे नेणारे दिशादर्शक यंत्र आहे. द्वंद्वात्मक भौतिकवादाच्या सहाय्यानेच भूतकालातील व वर्तमानकाळातील घटनांची संगती लावून भविष्यकाळाचा वेध घेण्याचा यशस्वी प्रयत्न माक्सने केला आहे.
द्वंद्वात्मक भौतिकवाद या संकल्पनेत द्वंद्ववाद व भौतिकवाद अशा दोन संकल्पना अंतर्भूत आहेत. कार्ल मार्क्सने हेगेलच्या तत्त्वज्ञानातून द्वंद्ववाद ही संकल्पना तर लुडविक फायरबाखच्या प्रभावातून भौतिकवाद या संकल्पनेचा स्वीकार केला आहे. म्हणूनच अफवास्येव हा रशियन विचारवंत असे म्हणतो की, ‘मार्क्सने द्वंद्ववाद व भौतिकवाद या अनुक्रमे हेगेल व फायरबाखच्या विचारांचे शुध्दीकरण केले त्यात समन्वय घडवून आणला व द्वंद्वात्मक भौतिकवादाची संकल्पना विकसित केली. यापैकी द्वंद्ववाद ही संकल्पना हे स्पष्ट करते की, संघर्ष हा जगाच्या विकासप्रक्रियेचा आधार आहे तर भौतिकवाद ही संकल्पना, जगाचे मूलतत्त्व किंवा अंतिम सत्य भौतिक वस्तु आहेत हे स्पष्ट करते.’

हेगेलचा द्वंद्ववाद :-

द्वंद्ववाद हा शब्द Dialogue या ग्रीक शब्दापासून बनला आहे. Dialogue या शब्दाचा अर्थ वादविवाद म्हणजेच शाब्दीक द्वंद्व अथवा संघर्ष असा होतो. तसे पाहता, द्वंद्ववाद ही संकल्पना फार प्राचीन अशी आहे. प्राचीन ग्रीक विचारवंत हेरेक्लीटस म्हणतो की, ‘संघर्ष हाच सर्व गोष्टीचा उगम अथवा पिता होय.’ याच द्वंद्ववादाचा हेगेलने जोरदार पुरस्कार केला होता. बर्लिन विद्यापीठात शिकत असतांना कार्ल मार्क्स युवा हेगेलवाद्यांच्या संपर्कात आला. हेगेलच्या मते, ‘मानवी संस्कृतीचा विकास हा सरळ रेषेत झालेला नाही तर वळणा-आडवळणांनी एखाद्या स्प्रिंगप्रमाणे अत्यंत जटील व गुंतागुंतीच्या पद्धतीने झाला आहे. जग हे स्थीर नाही ते सतत बदलणारे आहे, विकासवादी आहे इतिहास व विकास ही विश्वात्म्याची क्रमिक अभिव्यक्ती होय.’ याचाच अर्थ असा की विकासामागे, संघर्षामागे एक ईश्वरी शक्तीच कार्य करत असते, असे हेगेलचे मत आहे. आधी विचार निर्माण होतो व त्यातून वस्तू आकार घेतात ही विकास प्रक्रिया वाद-प्रतिवाद-संवाद या तत्त्वाने पूढे जाते. सर्वप्रथम एक विचार अस्तित्त्वात येतो, त्याला हेगेल ‘वाद’ असे संबोधतो. कालांतराने वादाच्या अंतर्विरोधातून विरोधी विचार पुढे येतो, तो म्हणजे ‘प्रतिवाद’ व या दोन विचारामध्ये संघर्ष होतो. त्यानंतर समन्वय होवून त्यातून अधिक चांगला व विकसित विचार पुढे येतो तो म्हणजे ‘संवाद’ होय. या संवादालाच पुढे ‘वादा’चे स्वरुप प्राप्त होते व संघर्षाची, विकासाची प्रक्रिया पुढे मार्गक्रमण करते.

मार्क्सचा द्वंद्वात्मक भौतिकवाद :-
कार्ल मार्क्सवर हेगेलचा प्रभाव असला तरीही मार्क्सने हेगेलची द्वंद्ववादाची संकल्पना जशासतशी स्वीकारली नाही. हेगेलचा ‘वाद’, ‘प्रतिवाद’ व ‘संवाद’ हा क्रम व संघर्षातून विकास हे तत्त्व मार्क्सने स्वीकारले. पण हेगेलच्या द्वंद्ववादातील ईश्वरशक्ती अथवा विचारशक्ती हे विकासाचे प्रेरक तत्त्व असते, हे मत मात्र त्याला मान्य नाही. कार्ल मार्क्स हा एक भौतिकवादी विचारवंत आहे. मार्क्सच्या मते, ‘जग व जगातील भौतिक वस्तू हेच अंतिम सत्य होय.’ भौतिकवादाच्या सहाय्यानेच जगाचे यथार्थ व वास्तववादी ज्ञान, आकलन होवू शकते. मार्क्सच्या मते, भौतिक वस्तूच मानवी विचारांना व कल्पनांना चालना देतात. भौतिक वस्तू आधी निर्माण होतात, असा नेमका हेगेलच्या मताच्या विरोधी विचार मार्क्सने मांडल्यामुळे एके ठिकाणी मार्क्स म्हणतो, ‘हेगेलचा द्वंद्ववाद हा डोक्यावर उभा होता, त्याला पायावर उभे करण्याचे काम मी केले.’

मार्क्सच्या मते, आर्थिक व भौतिक घटक समाज परिवर्तनास कारणीभूत ठरतात. प्रत्येक वस्तूत व प्रक्रियेत परस्परविरोधी गुण असतात आणि ते एकमेकांशी संघर्षरत राहून परस्परावर मात करण्याचा प्रयत्न करतात. या संघर्षातून विकास घडतो. जूने रुप बदलून नवे रुप घेणे, जुना गुणधर्म बदलून नवा गुणधर्म घेणे ही एक अपरिहार्य व विकासासाठी आवश्यक बाब आहे. जे नवे निर्माण झालेले असते ते जून्यापेक्षा अधिक चांगले असते या संदर्भात एंजल्सने नकारातून नकारवादाचे उदाहरण दिले आहे. त्याच्या मते, ज्वारीचे बी जमिनीत पेरले तर त्यापासून रोप तयार होते म्हणजेच रोपाच्या अवस्थेने बिजाच्या अवस्थेला नकार दिलेला असतो. पुढे त्यास कणीस येते, ती विकासाची अवस्था होय. ज्वारीचे बी हे ‘वाद’, रोपटे हे ‘प्रतिवाद’ तर कणीस ही ‘संवादा’ची अवस्था होय. मानवी समाजाच्या संदर्भातही अशाच पद्धतीने संघर्ष व विकासाची प्रक्रिया गतिमान होते. सर्व प्रकारचे आंतरिक विरोध नष्ट होवून एक आदर्श स्थिती निर्माण होईपर्यंत संघर्ष व समन्वयाची प्रक्रिया चालते व भौतिक वस्तूच्या सहाय्यानेच हा संघर्ष पूढे जात असतो.

द्वंद्वात्मक भौतिकवादाची वैशिष्ट्ये :- मार्क्सच्या द्वंद्वात्मक भौतिकवादाची काही प्रमुख वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत-

१. मार्क्सच्या मते भौतिक वस्तू हेच अंतिम सत्य आहेत भौतिक वस्तूमुळेच मानवी कल्पनेला, विचाराला, विकासाला चालना मिळते.

२. प्रत्येक भौतिक वस्तूत एक प्रकारची गती अंतर्भूत असते.

३. प्रत्येक वस्तूत परस्पर विरोधी तत्त्व अंतर्भूत असतात, या परस्परविरोधामुळेच संघर्षाची, द्वंद्वाची प्रक्रिया गतिमान होते.

४. विश्वाचा विकास हा विशिष्ट प्रक्रियेने व टप्या-टप्याने होतो व येणारी प्रत्येक अवस्था ही मागच्या प्रत्येक अवस्थेपेक्षा अधिक विकसित असते.

५. संघर्षामुळे जे परिवर्तन होते ते संख्यात्मक व गुणात्मक स्वरुपाचे असते.

६. सर्व विश्व हे स्वतंत्र व असंबंध वस्तूंचा संग्रह नाही तर त्यामध्ये एक परस्पर संबंध, परस्पर निर्भरता व एकता आहे.

टीका :-
कार्ल मार्क्सने द्वंद्वात्मक भौतिकवादाची संकल्पना मांडून मानवी समाजाच्या विकास प्रक्रियेचे चित्र उभे केले आहे. या संकल्पनेमध्ये पूढील प्रकारच्या त्रुटी अथवा दोष मात्र टीकाकारांना दिसून येतात.
मार्क्सच्या मते, संघर्षातूनच विकासप्रक्रिया मार्गक्रमण करत असते. टीकाकारांच्या मते, संघर्षाच्या ऐवजी शांतता, सहकार्य, समन्वयाच्या वातावरणातच विकास होवू शकतो. तसेच,
मार्क्सने या विकास प्रक्रियेत भौतिक वस्तूला प्रमुख स्थान दिले आहे. पण खऱ्या विकासाच्या प्रक्रियेत महापुरुषांचे कार्य, सामाजिक संस्थांचा सहभाग या सर्व गोष्टी दुर्लक्षित करता येणार नाहीत.
मार्क्सच्या मते, प्रत्येक जड वस्तूतही चेतना किंवा गती असते. पण, खऱ्या अर्थाने व्यक्तीद्वारे अशा जड वस्तूंना ती प्रदान केल्या जाते. अशा काही टीकांमूळे तसेच, काही परस्परविरोधी विचारांमुळेच मार्क्सची द्वंद्वात्मक भौतिकवादाची संकल्पना बऱ्याच अंशी अस्पष्ट व दोषपूर्ण दिसून येते.

वरीलप्रमाणे मार्क्सच्या द्वंद्वात्मक भौतिकवादात काही दोष दिसून येत असले तरी या संकल्पनेचे महत्त्व आपल्याला नाकारता येत नाही. विकास प्रक्रियेचे प्रेरक तत्त्व ईश्वरी शक्ती नसून भौतिक वस्तू आहेत हे मत मांडून मार्क्सने समाजाची एक प्रकारे मानसिक गुलामगिरीतून मुक्तता केली आहे. विकासासाठी स्वतःच्या प्रयत्नांची गरज असते हे सांगून समाजाला दैववादी पर मानसिकतेतून बाहेर काढण्याचा प्रयत्न मार्क्सने केला आहे. तसेच या विकास प्रक्रियेचा अंतिम टप्पा हा शोषणविरहीत साम्यवादाची अवस्था असू शकतो हे चित्र शोषित समाजापुढे निर्माण करुन त्यांना क्रांतीसाठी संघटीत व प्रवृत्त ते करण्यामध्येही या संकल्पनेचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *