राजकीय सिध्दांतांच्या केंद्रस्थानी असलेली महत्वपूर्ण व बहुचर्चित अशी ‘स्वातंत्र्य’ ही एक संकल्पना होय. ‘स्वातंत्र्य’ हे मानवी समाजातील एक आदर्श मूल्य होय. या मूल्याच्या प्राप्तीसाठी मानवाने केलेल्या संघर्षाचा एक गौरवशाली इतिहास आहे. कोणत्याही बाह्य निर्बंधाशिवाय विचार आणि आचरणाची कृती करण्याची इच्छाशक्ती या संघर्षाच्या मूळाशी आहे. व्यक्ती, समाज आणि राज्यासाठीही स्वातंत्र्याची संकल्पना महत्वाची आहे. व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी स्वातंत्र्य ही पूर्वअट आहे. कोणत्याही व्यक्तिचा,समाजाचा व राष्ट्राचा विकास स्वातंत्र्याशिवाय होऊच शकत नाही. स्वतंत्र नसणे म्हणजे कुंठित, दुर्बल आणि अर्थहीन होणे. स्वतंत्र असणे म्हणजे आपल्या भविष्याला अपेक्षित आकार देता येणे, आपल्या आदर्शाना व्यवहारात परिवर्तित करण्याचे सामर्थ्य आणि आपल्या व्यक्तिमत्त्वातील क्षमतांना मूर्त रूप देता येणे होय. बाराशे 0000ची मॅग्ना चार्ट क्रांत्यांनी व त्यानंतर वसाहतवादाच्या काळात उभ्या राहिलेल्या स्वातंत्र्यलढ्यांनी स्वातंत्र्य हे एक मूलभूत सामाजिक मूल्य आहे, स्वातंत्र्य ही व्यक्तीची, समाजाची व राष्ट्राची एक मूलभूत गरज आहे ही बाब अधोरेखित करण्याचे कार्य केले. अशा स्वातंत्र्य या संकल्पनेसाठी इंग्रजी भाषेत वापरला जाणारा ‘LIBERTY हा शब्द लॅटीन भाषेतील ‘Liber’ या शब्दापासून तयार झाला ज्याचा अर्थ ‘बंधनापासून मुक्त’ असा होतो. यामुळेच अनेक जण ‘बंधनाचा अभाव’ म्हणजे स्वातंत्र्य, असा अर्थ काढतात. स्वातंत्र्य या संकल्पनेचा विविध विचारवंतांनी आपापल्या पध्दतीने लावला आहे त्यामुळे राजकीय सिध्दांतातील एक अस्पष्ट व संभ्रमात टाकणारी संकल्पना म्हणून स्वातंत्र्याच्या संकल्पनेकडे पाहीले जाते. स्वातंत्र्याचा अर्थ व स्वरुप याविषयी विचारवंतामध्ये बरेच मतभेद आहेत. स्वातंत्र्याचा अर्थ स्पष्ट करणाऱ्या काही प्रमुख व्याख्या पुढीलप्रमाणे सांगता येतील.
1)मॅकेनी:- “स्वातंत्र्य म्हणजे बंधनाचा अभाव नाही तर अनुचित बंधनाऐवजी उचित बंधनांची व्यवस्था होय.”
2) ग्रीन:- “स्वातंत्र्य म्हणजे करण्यास योग्य असे कार्य करण्याची व उपभोगण्यास योग्य असा आनंद प्राप्त करण्याची भावात्मक शक्ती होय.”
3)लास्की:- “समाजातील व्यक्तीला आपला सर्वागिण विकास करता येईल अशी आवश्यक बाह्य परिस्थिती म्हणजे स्वातंत्र्य होय.”
4) हर्बर्ट स्पेन्सर:- “व्यक्ती विकासासाठी आवश्यक असणाऱ्या जास्तीत जास्त
सोयी कमीत कमी बंधने लादून उपलब्ध करून देणे म्हणजे स्वातंत्र्य होय.”
5)सीले:- “स्वातंत्र्य म्हणजे अति शासनाचा विरोध होय.”
6) मॅकफर्सन : “व्यक्तीला समृध्द जीवन जगता यावे यासाठीच्या आवश्यक अटी म्हणजे स्वातंत्र्य होय.”
7) जे डी एच कोल : “कोणत्याही बंधनाशिवाय आपल्या व्यक्तिमत्त्वास व्यक्त करणे म्हणजे स्वातंत्र्य होय.”
वरील व्याख्या पाहील्यानंतर स्वातंत्र्य या संकल्पनेचे दोन मुख्य तत्वे समोर येतात एक म्हणजे बाह्य नियंत्रणाचा अभाव व दुसरे म्हणजे क्षमतांच्या विकासासाठी आवश्यक बाह्य परिस्थिती. व्यक्तीच्या आचारा विचारावर बाह्य दडपण अथवा बंधने असतील तर व्यक्तीच्या विकास प्रक्रियेत अडथळे निर्माण होतात. परंतु याचा अर्थ स्वातंत्र्य ही सर्व प्रकारच्या बंधनापासूनची मुक्तता असाही होत नाही. स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी काही बंधने आवश्यक व अपरिहार्य ठरतात अन्यथा एका अराजकाची परिस्थिती समाजात निर्माण होईल. कायदे हे एक अर्थाने बंधनाचेच प्रतिक असतात. त्याबद्दल जॉन लॉक हा विचारवंत एके ठिकाणी असे म्हणतो की “जीथे कायदे नसतात तीथे स्वातंत्र्यही नसते.” स्वातंत्र्याचा उपयोग हा एका विशिष्ट परिघामध्ये राहूनच केला जाऊ शकतो. प्रत्येकाने आपल्या क्षमतांचा विकास घडवून आणतांना इतरांच्या क्षमतांच्या विकासामध्ये बाधा येणार नाही याची दक्षता घेणे हे प्रत्येकाचे मूलभूत दायित्व अथवा जेथे स्वातंत्र्य असते तेथे जबाबदारीही असते. एका जबाबदार व्यक्तीलाच स्वातंत्र्याचा अधिकार असू शकतो. स्वातंत्र्य या संकल्पनेचा वास्तविक अर्थ ते एक सामाजिक मूल्य आहे व म्हणून एका व्यक्तीचे स्वातंत्र्य अन्य व्यक्तीच्या स्वातंत्र्याशी निगडित असते या दृष्टिकोनातून समजून घेतला पाहिजे.