विशिष्ट भूप्रदेशात मध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये एकत्वाची भावना निर्माण करण्यामध्ये काही घटकांचे महत्त्वपूर्ण योगदान असते, त्यांनाच राष्ट्रवादाचे आधारभूत घटक असे संबोधले जाते. राष्ट्रवादाचे आधारभूत घटक पुढीलप्रमाणे
1) वांशिक एकता:- वांशिक दृष्ट्या आपण एक आहोत, आपण सर्वजण एकाच रक्ताचे आहोत या जाणिवेतून एकात्मतेची भावना वाढीस लागते. मानववंशशास्त्रिय दृष्टिकोनातून समान शारीरिक ठेवण असल्यामुळे व्यक्ती-व्यक्ती मध्ये सहकार्य व आपुलकीची भावना वाढते. त्यामुळे वांशिक एकता या घटकाला ही राष्ट्रवादाचा एक आधारभूत घटक म्हणून मानले जाते. इस्रायल हे वांशिक एकतेच्या आधारावरील राष्ट्रवादाचे एक महत्वपूर्ण उदाहरण आहे. जगभर विखुरलेल्या ज्यू वंशियांनी एकत्र येऊन इस्रायल या राष्ट्राची निर्मिती केली..
2) भाषिक एकता:- भाषा हे माणसांच्या अभिव्यक्तीचे, परस्परातील वैचारिक देवाण-घेवाण यांचे महत्त्वपूर्ण साधन आहे. कोणताही लोकसमूह आपल्या इच्छा, आशा-आकांक्षा, भावभावना भाषेच्या साहाय्यानेच व्यक्त करत असतो. त्यामुळे भाषा हे व्यक्ती व्यक्तीला जोडण्याचे एक माध्यम आहे. व म्हणूनच भाषा हा राष्ट्रवादाचा आधारभूत घटक ठरतो.
ब्लंटश्लीच्या मते, ” भाषा राष्ट्रवादाचे अविभाज्य अंग आहे.” तर गार्नर हा विचारवंत म्हणतो की, ” वांशिक एकतेपेक्षा भाषिक एकता हा घटक राष्ट्रवादाच्या निर्मितीस अधिक प्रभावी सिद्ध झाला आहे.” युरोपमध्ये सर्वसाधारणपणे समान धर्म, वंश असतांनाही भाषेच्या आधारावर राष्ट्र निर्मिती व राष्ट्रीय एकता या प्रक्रिया दिसून येतात. पाकिस्तान मधील पाकिस्तान हा भाग फुटून निघून बांगलादेश हे नवीन राष्ट्र निर्माण होण्यामध्ये बांग्ला भाषेची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. भारतासारखे राष्ट्र भाषिक विविधतेसह राष्ट्रीय एकात्मता प्रस्थापित करण्यात मोठ्या प्रमाणात यशस्वी होते.
3) भौगोलिक एकता:- भोगोलिक एकता राष्ट्रवादाचा एक प्रमुख व आधारभूत घटक आहे भौगोलिक एकता, सलगता व अखंडता असेल तर त्या भूप्रदेशावर राहणाऱ्या लोकांमध्ये एकत्वाची भावना निर्माण होते. भौगोलिक विलगतेमुळे पाकिस्तान हे राष्ट्र त्याच्या पूर्व व पश्चिम भागात एकत्वाची भावना निर्माण करू शकले नाही. परिणामी 1971 यावर्षी पाकिस्तानचा पूर्व पाकिस्तान हा भाग बांगलादेश या स्वतंत्र व सार्वभौम राष्ट्रात रूपांतरित झाला.
4) धार्मिक एकता:- धार्मिक एकजिनसीपणातून लोकांमध्ये एकत्वाची भावना निर्माण होते, यामुळे धार्मिक एकता हा राष्ट्रवादाचा एक आधारभूत घटक मानला जातो. परंतु भारत अमेरिका यासारखी अनेक राष्ट्रे धार्मिक विविधतेसह राष्ट्रवादाची भावना निर्माण करण्यास यशस्वी ठरली आहेत.
5) समान संस्कृती:- समान संस्कृती, समान चालीरीती, प्रथा-परंपरा, साहित्य, आचार-विचार, व्यवहार, वेशभुषा, शिक्षण, इतिहास, सण-समारंभ अशा समान संस्कृतीतूनही एखाद्या राष्ट्रामध्ये एकात्मतेची जाणीव वृद्धिंगत होते.
यासोबतच समान राजकीय उद्देश आणि समान हितसंबंध हे सुद्धा राष्ट्रवादाचे आधारभूत घटक मानले जातात.
विद्यार्थ्यांसाठी सूचना:- कोणत्याही प्रश्नाच्या उत्तराचा शेवट आपल्याला समारोप, मूल्यमापनाने करावा लागेल. राष्ट्रवाद म्हणजे काय आणि राष्ट्रवादाच्या आधारभूत घटक वाचून दहा पंधरा ओळी मध्ये आपण या उत्तराचा समारोप आपल्या शब्दात करावा.