आजच्या जगाचा इतिहास आणि भूगोल प्रभावित करणारी एक महत्वपूर्ण विचारप्रणाली म्हणजे राष्ट्रवाद होय. 1848 च्या वेस्टफॉलिया तहानंतर उदयास आलेल्या राष्ट्र राज्यव्यवस्थेचा ‘राष्ट्रवाद’ हाच मूलाधार राहिलेला आहे. राष्ट्रवाद या संकल्पनेचा सरळ साधा अर्थ राष्ट्रप्रेमाची भावना असा होतो. राष्ट्रवाद म्हणजे काय? हे समजून घेण्यासाठी आपल्याला आधी, राष्ट्र म्हणजे काय? हे समजून घ्यावे लागेल. राष्ट्रासाठी इंग्रजी भाषेमध्ये ‘Nation’ हा पर्यायी शब्द वापरला जातो. Nation या इंग्रजी शब्दाची उत्पत्ती लॅटिन भाषेतील ‘Natio’ या शब्दापासून झाली आहे. ज्याचा अर्थ ‘जन्म’ किंवा ‘वंश’ कसा होतो. व्यक्तीला जन्मतः मिळालेला धर्म, वंश, भाषा, संस्कृती, परंपरा यामुळे एखाद्या लोक समूहामध्ये निर्माण झालेली एकत्वाची भावना हा राष्ट्रप्रेमाचा म्हणजेच राष्ट्रवादाचा आरंभ बिंदू असते. राष्ट्रवाद नागरिकांमध्ये बंधूभाव, निष्ठा, त्यागाची भावना, राष्ट्रहिताला अग्रक्रम अशा बाबींची रुजवणूक करत असतो. एका उन्नत समाज जीवनाकडे, आर्थिक प्रगतीकडे नेण्याचे सामर्थ्य राष्ट्रवादामध्ये आहे. साम्राज्यवादाला, वसाहतवादाला आव्हान देण्याचे महत्कार्य राष्ट्रवादाने केले असले तरीही आत्यंतिक, आक्रमक राष्ट्रवाद जगाला युद्धाकडे नेऊ शकतो याचा प्रत्ययही मानव जातीला दुसऱ्या महायुद्धाच्या रुपाने आला आहे. राष्ट्र म्हणजे नेमके काय? आणि राष्ट्रवाद म्हणजे नेमके काय? हे आपल्याला पुढील काही व्याख्यांच्या माध्यमातून सूत्रबद्ध रुपात समजून घेता येईल.
राष्ट्र या संकल्पनेच्या काही व्याख्या:-
1)बर्जेस:-
. “वांशिक ऐक्य असलेला व एकाच भौगोलिक प्रदेशात राहणारा जनसमुदाय म्हणजे राष्ट्र.”
2)गार्नर:-
. “ज्या जनतेची संस्कृती समान आहे, जी जनता वैचारीक आणि मानसिक जीवनाची व आचाराविचारांची एकता हेतुपुरस्पर आणि कसोशीने कायम ठेवतात, त्या लोकांचे राष्ट्र तयार होते.”
. अशा प्रकारे एका विशिष्ट भूप्रदेशात राहणाऱ्या आणि समान भाषा, समान वंश, समान धर्म, समान संस्कृती, चालीरीती व परंपरा यांच्यामुळे एकत्वाची भावना असणाऱ्या लोकसमूहाचे राष्ट्र बनते आणि अशा राष्ट्राविषयी असलेली प्रेमाची, त्यागाची, बलिदानाची भावना राष्ट्रवाद म्हणून ओळखली जाते. मुख्यत्वे राष्ट्रवाद ही एक मानसिक भावना आहे. राष्ट्रवाद या संकल्पनेच्या काही व्याख्या खालील प्रमाणे पाहता येतील.
1)अल्फ्रेड डी ग्रासीया:-
. “राष्ट्रवाद स्वदेशासाठी प्रेम आणि परकियांविषयी जागरूकता निर्माण करतो.”
2)एम एच हिन्से:-
. “आपल्या राष्ट्राप्रतीच्या निष्ठेची जाणीव असणारी मनाची अवस्था म्हणजे राष्ट्रवाद होय.”
3) प्रा हेरॉल्ड लास्की:-
. “समान वंश, भाषा, इतिहास, परंपरा, वास्तव्य व राजकीय आकांक्षा या सर्वामुळे अगर त्यापैकी काहींच्या प्रभावामुळे निर्माण होणारी एकतेची भावना म्हणजे राष्ट्रवाद होय.
4) लॉर्ड ब्राईस:-
. ” भाषा, संस्कृती, साहित्य, रूढी व परंपरा यांच्या समानतेमुळे भावनात्मक आणि मानसिकदृष्ट्या समाजात निर्माण झालेली ऐक्याची भावना म्हणजेच राष्ट्रवाद होय.”
प्रा. गिलख्रिस्ट:-
. ” एकाच वंशाची, एकाच प्रदेशात वास्तव्य करणारे, एकच भाषा बोलणारे, समान धर्म व समान परंपरा असणारे लोक, जेव्हा समान राजकीय संघटनेमध्ये राहतात. तेव्हा त्यांच्या मनात एक विशिष्ट राजकीय ऐक्याची भावना निर्माण होते, त्यालाच राष्ट्रवाद असे म्हणतात.”
राष्ट्रवाद या संकल्पनेचा वरील व्याख्या पाहिल्यानंतर आपल्याला ही लक्षात येते की अल्फ्रेड डी ग्रासीया, एम एच हिन्से या विचारवंतांनी व्यक्ती समूहातील एकत्वाची भावना व राष्ट्राप्रतीची निष्ठा यांना केंद्रस्थानी ठेवले आहे तर हेरॉल्ड लास्की, गिलख्रिस्ट, लॉर्ड ब्राईस यांनी राष्ट्रवादाची व्याख्या करतांना एकत्वाच्या भावनेने सोबतच एकत्वाची भावना निर्माण करणाऱ्या घटकांवरही भर दिलेला आहे. हे एकत्व निर्माण करणारे घटकच, राष्ट्रवादाचे घटक म्हणून ओळखले जातात.
