राज्य (State) म्हणजे का?
. आजच्या मानवी जीवनाचा अविभाज्य भाग असलेली आणि राज्यशास्त्र या विषयाच्या अभ्यासाचा केंद्रबिंदू असलेली संस्था म्हणजे राज्यसंस्था होय. मानवाने आपल्या गरजांच्या पूर्ततेसाठी कुटुंबसंस्था, विवाहसंस्था, धर्मसंस्था, समाजसंस्था अशा अनेक संस्था निर्माण केल्या. मानवाच्या समाजशील प्रवृत्तीतून निर्माण झालेली राज्यसंस्था ही सर्व सामाजिक संस्थांच्या शिखरस्थानी आहे. म्हणूनच राज्यसंस्थेला ‘Istitution of institution’s • असे संबोधले जाते. आजघडीला आपल्या दैनंदिन जीवनाचे असे एकही क्षेत्र नाही जे राज्याच्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष नियंत्रणापासून मुक्त आहे. राज्यसंस्था व व्यक्ती यांमध्ये एक अतूट असे नाते असते. या संदर्भात राज्यशास्त्राचा जनक अ़ॅरिस्टॉटल असे म्हणतो की, “राज्याशिवाय राहणारी व्यक्ती एकतर परमेश्वर असली पाहिजे किंवा हिंस्र पशू तरी.” व्यक्तीची प्रगती, सुख, समाधान व नैतिक विकास हा राज्याशिवाय अशक्य आहे..
. ‘राज्य’ या शब्दासाठी इंग्रजी भाषेतील ‘state’ हा पर्यायी शब्द वापरला जातो. ‘state’ या शब्दाची उत्पत्ती ‘ट्यूटॉन’ जमातीच्या ‘status’ या शब्दापासून झाली. या भाषेतील ‘स्टेटस-रे-रिपब्लीक’ या शब्दाचा अर्थ नागरिकत्व असा होतो. मात्र, काही विचारवंतांच्या मते, ‘state’ हा शब्द ‘polis’ या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. आधुनिक राजकीय साहित्यात State हा शब्द सर्वप्रथम निकोलो मॅकव्हली या इटालियन विचारवंताने त्याच्या ‘द प्रिन्स’ या ग्रंथात वापरला. दैंनदिन व्यवहारात राज्य हा शब्द वेगवेगळ्या अर्थानी म्हणजेच घटकराज्यांसाठी, सरकारसाठी वापरला जातो. तेव्हा राज्य या शब्दाचा निश्चित अर्थ व्याख्येच्या माध्यमातून पाहणे महत्त्वाचे ठरते. परंतु, राज्याच्या व्याख्येच्या संदर्भात एकमत आढळत नाही, कारण वेगवेगळे विचारवंत राज्यसंस्थेकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहतात. काहींच्या मते, राज्य ही कल्याणकारी संस्था आहे, तर काहींना राज्य हे शक्तीचे व शोषणाचे प्रतीक वाटते. तसेच काही विचारवंत राज्य ही एक आवश्यक आपत्ती मानतात. राज्यसंस्थेचा अर्थ स्पष्ट करणाऱ्या व्याख्या पुढीलप्रमाणे पाहता येतील.
राज्याची व्याख्या (Definition of State)
१. ॲरिस्टॉटल :
“सुखी, समाधानी, व स्वयंपूर्ण जीवनाची प्राप्ती हा उद्देश असलेला कुटुंब आणि खेड्यांचा संघ म्हणजे राज्य होय.”
२. वुड्रो विल्सन :
“एका निश्चित भूप्रदेशात कायद्याच्या निर्मितीसाठी संघटित झालेला समूह म्हणजे राज्य होय.”
३. विलोबी :
“कायदेनिर्मितीचा अंतिम अधिकार असणारी शक्ती म्हणजे राज्य होय.”
४. ऑगबर्न :
“विशिष्ट अशा भूप्रदेशावर सर्वोच्च शासनामार्फत राज्यकारभार करणारी यंत्रणा किंवा संघटना म्हणजे राज्य होय.”
५. ब्लंटश्ली:
“निश्चित अशा भूप्रदेशात राजकीयदृष्ट्या सुसंघटित झालेला लोकांचा समुदाय म्हणजे
राज्य होय.”
६. कार्ल मार्क्स :
“आहे रे’ वर्गाने ‘नाही रे’ वर्गाचे शोषण करण्यासाठी निर्माण केलेली यंत्रणा म्हणजे राज्य होय.”
७. गार्नर :
“एखाद्या विशिष्ट भूप्रदेशावर कमी-अधिक संख्येने कायम स्वरूपात वास्तव्य करणारा, कोणत्याही बाह्य नियंत्रणापासून पूर्णपणे किंवा जवळजवळ स्वतंत्र असणारा व ज्यातील सरकारच्या आज्ञा बहुसंख्य लोक स्वाभाविकपणे पाळतात, असा समाज म्हणजे राज्य होय.”
वरील विविध विचारवंतांनी केलेल्या व्याख्या वेगवेगळ्या घटकावर प्रकाश टाकतात. त्यांपैकी गार्नर यांची व्याख्या राज्यसंस्थेच्या चारही घटकांची स्पष्ट मांडणी करणारी असल्यामुळे ती एक परिपूर्ण व्याख्या ठरते.