स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतांना विद्यार्थ्यांना बुकर टी वॉशिंग्टन हे नाव वाचनात येते. महात्मा ज्योतिराव फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील या दोघांनाही ‘बुकर टी वॉशिंग्टन’ ही पदवी बहाल केलेली आहे. दोन व्यक्तींना एकच पदवी कशी दिली गेली? केव्हा दिली? कोणी दिली? आणि मुळात बुकर टी वॉशिंग्टन ही व्यक्ती कोण होती? त्यांचे नेमके कोणते कार्य होते? हे आपण आता थोडक्यात पाहू.
महात्मा ज्योतिराव फुले यांना ‘भारताचे बुकर टी वॉशिंग्टन’ असे म्हंटले जाते. जोतिराव फुले यांना ‘महात्मा’ ही उपाधी ज्या सत्कार समारंभामध्ये 11मे 1888 रोजी दिली गेली त्या सत्कार समारंभाचे आमंत्रण बडौदा संस्थानचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनाही देण्यात आले होते. सयाजीराव महाराज या समारंभास उपस्थित राहू शकले नाहीत परंतु जोतीरावांना ‘हिंदुस्थानचे बुकर टी. वॉशिंग्टन’ अशी पदवी द्यावी असा निरोप दामोदर सावळाराम यंदे यांच्याकरवी सयाजीराव महाराजांनी पाठविला होता.
दैनिक लोकसत्ताचे संपादक ह. रा. महाजनी यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांचा गौरव करतांना कर्मवीरांना ‘महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन’ असे संबोधन वापरले.
बुकर टी वॉशिंग्टन (जन्म1856- मृत्यू 14 नोव्हेंबर 1915) हे एक अमेरिकन निग्रो गुलाम होते. 1 जानेवारी 1863 रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी अमेरिकेतील गुलामांच्या मुक्ती ची घोषणा केली. त्यानंतर 1865 मध्ये अमेरिकन संविधानाच्या 13व्या दुरुस्तीनुसार गुलामगिरीची प्रथा बंद करण्यात आली. गुलामीतून मुक्त झालेल्या बुकर टी वॉशिंग्टन यांनी अत्यंत हलाखीच्या व खडतर परिस्थितीत हॅम्पटन येथील शाळेमध्ये ‘कमवा आणि शिका’ सारख्या योजनेच्या आधारावर आपले शिक्षण पूर्ण केले. शिक्षणानंतर वॉशिंग्टन यांनी आपले आयुष्य निग्रोंच्या शिक्षण प्रसार चळवळीला समर्पित केले. बुकर टी वॉशिंग्टन यांनी अमेरिकेच्या अलबामा प्रांतातील टस्कगी येथे निग्रोंना शिक्षण देणारी एक शिक्षणसंस्था उभी केली. ‘अप फ्रॉम स्लेव्हरी’ हे बुकर टी वॉशिंग्टन यांचे एक पुस्तक आहे. साधना प्रकाशन पुणे यांनी या पुस्तकाचा मराठीमध्ये “गुलामगिरीतून गौरवाकडे’ असा अनुवाद केला आहे. या पुस्तकाच्या मागील पानावर अर्थात ब्लर्बमध्ये या पुस्तकाविषयी सांगितले आहे की, “एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात अमेरिकेत नागरी युद्धानंतर गुलामगिरीची अधिकृतरीत्या समाप्ती झाल्यानंतर पूर्वीच्या गुलामांना स्वावलंबी, सशक्त आणि स्वाभिमानपूर्वक जगण्यासाठी बुकर टी. वॉशिंग्टन यांनी अथक परिश्रम करून जे अतुलनीय कार्य केले त्याची हकिगत Up from Slavery या पुस्त त्या पुस्तकाचा हा अनुवाद आहे. आली आहे, रूढार्थाने बुकर टी. वॉशिंग्टन यांचे हे आत्मचरित्र नव्हे. The story of My life and work हे त्यांचे आत्मचरित्र १९०० मध्ये प्रसिद्ध झाले. १९०१ मध्ये आलेल्या Up from Slavery ची सुरुवात बरीचशी आत्मकथनात्मक असली तरी मूलत: निग्रोंची- पूर्वीच्या गुलामांची- अवस्था सुधारून त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी जे प्रयत्न झाले आणि त्याला समाजातून जो प्रतिसाद मिळाला त्याचे चित्रण या पुस्तकात केलेले आहे.”