भूप्रदेश हा एक राज्याचा आवश्यक व महत्त्वपूर्ण घटक मानला जातो. राज्याच्या निर्मितीसाठी एका निश्चित व विशिष्ट भूप्रदेशाची आवश्यकता असते. विशिष्ट भौगोलिक सीमारेषांच्या अंतर्गत संघटित झालेला जनसमूह हा राज्य म्हणून ओळखला जातो. त्यामुळेच फिरस्ती टोळ्यांकडे इतर घटक असूनसुद्धा विशिष्ट भूप्रदेशाअभावी त्यांना राज्य म्हणता येत नाही किंवा ज्यू लोकांना १९४७ साली निश्चित भूमी मिळाल्यानंतरच ‘इस्रायल’ हे राज्य आकारास आले. भूप्रदेश या शब्दामध्ये त्या विशिष्ट सीमारेषांच्या अंतर्गत येणारी जमीन, नद्या, जंगले, तलाव, पर्वत, समुद्र, नैसर्गिक खनिज संपत्ती, आकाश अशा विविध बाबींचा समावेश होतो.
भूप्रदेशाकडेसुद्धा संख्यात्मक व गुणात्मक या दोन्ही दृष्टिकोनांतून पाहिले जाते. भूप्रदेश किती असावा याबाबत वेगवेगळे मतप्रवाह आहेत. प्राचीन काळी लहान भूप्रदेश हा आदर्श मानला जाता होता. परंतु, आधुनिक काळात मोठा भूप्रदेश असावा, असे मानले जाते. कमी भूप्रदेश असेल तर ते राज्य आत्मनिर्भर व स्वावलंबी बनू शकत नाही. तसेच परकीय आक्रमणाला सहज बळी पडते; परंतु अशा राज्यात राजकीय एकजीनसीपण निर्माण होतो. कमी भूप्रदेश असतानाही जपान, इंग्लंड, इस्रायल यांनी फार मोठी प्रगती केलेली दिसून येते. आज जगात मोनॅको-८ चौ.कि.मी. सॅनमॅरिनो- ३८ चौ. कि.मी. अशी छोटी राज्ये दिसून येतात, तर अमेरिका, चीन, रशिया, भारत, ब्राझील अशी मोठी राज्ये दिसून येतात.
भूप्रदेश किती असावा याहीपेक्षा तो गुणात्मक दृष्टिकोनातून कसा असावा, हे अधिक महत्त्वाचे ठरते. राज्यातील जमीन सुपीक, नैसर्गिक साधनसंपत्ती व खनिज संपत्तीने युक्त • असावी, राज्याच्या सीमारेषा नैसर्गिक बाबींनी निश्चित झालेल्या असाव्यात. अशा प्रकारचा भूप्रदेश हा त्या राज्याला स्वावलंबी बनवू शकतो.