राज्यसंस्थेचे आवश्यक घटक :- (Elements of State)

राज्यसंस्थेच्या विविध विचारवंतांनी केलेल्या व्याख्येवरून राज्यसंस्थेचे लोकसंख्या, भूप्रदेश शासन संस्था व सार्वभौमत्व हे चार घटक स्पष्ट होतात. प्राचीन भारतीय विचारात कौटिल्याने राजा, जनपद, अमात्य, दुर्ग, कोश, दंड व मित्र असे राज्यसंस्थेचे सात घटक स्पष्ट करणारा सप्तांग सिद्धांत मांडलेला आहे. (४) सार्वभौमत्व आधुनिक राज्यशास्त्राने पुढील चार घटकांना मान्यता दिलेली आहे.
१. लोकसंख्या :- (Population)
राज्यसंस्थेचा अत्यंत महत्त्वपूर्ण व आद्य घटक म्हणून लोकसंख्येकडे पाहिले जाते. राज्य हे एक मानवी संघटन आहे. राज्याची व्याख्या करताना राजकीयदृष्ट्या संघटित लोकसमूह या शब्दरचनेवर भर दिला जातो. म्हणजेच व्यक्तीशिवाय राज्य अस्तित्वात येऊ शकत नाही. राज्यासाठी लोकसंख्या आवश्यक आहे, हे स्पष्ट झाल्यानंतर दोन प्रश्न निर्माण होतात. एक म्हणजे लोकसंख्या किती असावी व दुसरा प्रश्न म्हणजे लोकसंख्या कशी असावी. म्हणजेच लोकसंख्या या घटकाकडे संख्यात्मक व गुणात्मक दृष्टिकोनातून पाहिले जाते.
राज्याच्या लोकसंख्या या घटकाकडे संख्यात्मक दृष्टिकोनातून पाहताना राज्याची लोकसंख्या किती असावी, या संदर्भात प्राचीन ग्रीक राजकीय विचारवंतापासून ते आधुनिक राजकीय विचारवंतांनी आपली मते नोंदविली आहेत. राज्याच्या निर्मितीसाठी किती लोकसंख्या असावी किंवा किती लोकसंख्या राज्यासाठी आदर्श आहे, याविषयी मात्र विचारवंतांमध्ये मतभेद आहेत. प्लेटोच्या मते, राज्याची लोकसंख्या ५०४० असावी. तर, रुसोच्या मते, राज्याची लोकसंख्या, १०,००० असावी. तर, ॲरिस्टॉटल असे म्हणतो की, “लोकसंख्या ही शासन करण्याइतपत लहान असली पाहिजे आणि स्वयंपूर्ण होण्याइतपत मोठी असली पाहिजे.”
आज जगामध्ये सॅनमॅरिनो, मोनॅको असे कमी लोकसंख्या असलेले तर भारत, चीन, ब्राझील, अमेरिका, इंडोनेशिया, पाकिस्तान ही मोठी लोकसंख्या असलेली राज्ये दिसून येतात. कमी लोकसंख्येमुळे शासनव्यवस्थेला नियंत्रण ठेवणे सोपे जाते. राजकीय एकजिनसीपणा निर्माण होतो; परंतु अत्यंत कमी लोकसंख्येचा किंवा अतिलोकसंख्येचा विकासप्रक्रियेवर नकारात्मक प्रभावही पडतो. त्याचवेळी जास्त लोकसंख्या त्या देशापुढे भ्रष्टाचार, बेकारी, उदरनिर्वाहाचा प्रश्न, राहणीमानाचा दर्जा, अंतर्गत अशांतता असे अनेक प्रश्न निर्माण करते. तसेच वाढती लोकसंख्या विकास गिळंकृत करून टाकते. तेव्हा राज्याची लोकसंख्या किती असावी, याबाबत निश्चित नियम आढळत नाही. याबाबत एवढेच म्हणता येईल की, राज्याचा भूप्रदेश आणि साधनसामग्री या प्रमाणात तेथील लोकसंख्या असावी.
लोकसंख्येचा गुणात्मक दृष्टिकोनातून विचार करताना लोकसंख्या कशी आहे याला महत्त्व दिले जाते. चांगल्या स्वभावाचे, उत्तम चारित्र्याचे लोक असणे राज्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे ठरते. राष्ट्रनिष्ठ, कर्तव्यदक्ष, साहसी, मेहनती, संशोधन वृत्तीचे लोक राज्याच्या विकासात भर घालतात. याच गुण व प्रवृत्तीच्या बळावर जपान, इस्रायल अशा अनेक देशांनी प्रतिकूल भौगोलिक परिस्थिती व कमी लोकसंख्या असताना आपल्या देशाचा नेत्रोद्दीपक विकास घडवून आणला. अंधश्रद्धाळू, आळशी व दैववादी लोकसंख्या राज्याला • मागास ठेवण्याचे काम करते. त्यामुळेच राज्याची लोकसंख्या किती आहे यापेक्षा राज्याची लोकसंख्या कशी आहे, ती किती गुणवत्तावान आहे हे महत्त्वाचे ठरते. त्यामुळेच ॲरिस्टॉटल असे म्हणतो की, “चांगले लोक चांगले राज्य निर्माण करतात. ” Only good citizens make good state, while bad citizens make a bad state.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *